पालघर - भाजप हा संस्कृती असलेला पक्ष आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात विविध योजनांचे निधी थेट लाभार्थ्यांना मिळत आहेत, मात्र कॉंग्रेसच्या काळात अतिशय कमी निधी लाभार्थ्यांना मिळायचा असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी वाडामध्ये केले आहे. तसेच मोदींच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना द्या, आणि भाजपचे मतदार वाढवा असे आवाहन देखील भाजप कार्यकर्त्यांना केले आहे. त्यांनी वाड्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान ते बोलत होते.
भाजप राबवत असलेल्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा
सध्या पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी वाडा आणि मनोर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सध्या देशभरात भाजपकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, भाजपचे मतदार वाढवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. येणाऱ्या काळात भाजपचा मतदार वाढला पाहिजे, आपल्याला येणाऱ्या काळात सर्व निवडणुका जिंकायच्या आहेत असे देखील त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे.
कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश
दरम्यान अबिटघरमधील योगेश केशव पाटील या कार्यकर्त्याने तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी बाबाजी काठोळे, पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, सरचिटणीस संतोष जणाठे, उपाध्यक्ष संदीप पवार, तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, सरचिटणीस रोहन पाटील या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.