पालघर - शिवसेनेचे उत्तम घरत यांची पालघर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तसेच गटनेतेपदी शिवसेनेच्या कैलास म्हात्रे व भाजपचे भावानंद संखे यांची निवड करण्यात आली.
नगरपरिषद निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपमध्ये नगराध्यक्षपद सेनेला तर उपनगराध्यक्षपद भाजपला देण्याचे ठरले होते. मात्र, निवडणुकीत शिवसेनेचे नगराध्यक्षपद हुकल्यामुळे, उपनगराध्यक्षपदासाठी सेना-भाजपमध्ये रस्सीखेच पाहावयास मिळाली. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या लक्ष्मीदेवी हजारी तर शिवसेनेतून उत्तम घरत व सुभाष पाटील यांची नावे पुढे आली होती. मात्र, दोन वर्षे उपनगराध्यक्षपद शिवसेनेकडे व तीन वर्षे भाजपकडे या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले.
या फॉर्म्युल्यानुसार आज झालेल्या पालघर नागरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या लक्ष्मीदेवी हजारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने उत्तम घरत यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तसेच गटनेतेपदी शिवसेनेचे कैलास म्हात्रे व भाजपचे भावानंद संखे यांची निवड झाली असून स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे अरुण माने यांनी निवड करण्यात आली आहे.
पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी नगराध्यक्षपदी महाआघाडीच्या उज्वला काळे यांची निवड केली होती. त्यानंतर उपनगराध्यक्षपदी आता शिवसेनेच्या उत्तम घरत यांची निवड झाली आहे. पालघर नगरपरिषदेत शिवसेना १४ , भाजप ८ (महायुती- २२) अपक्ष ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ असे बलाबल आहे.