पालघर - समुद्रकिनार्याची धूप रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत एक आगळावेगळा उपक्रम राबविला जात असून यासाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग करण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत पालघर जिल्ह्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केळवे समुद्रकिनारी 'जिओ बॅग्स' तंत्रज्ञानाचा वापर करून वाळूचा बंधारा बांधण्यात येत आहे.
हेही वाचा - बोईसर परिसरात चोरांचा सुळसुळाट; रात्रीला चेहरे झाकलेले पाचजण फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद
केळवे समुद्रकिनारी बनवण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यासाठी जिओ बॅग्स (विशिष्ट पदार्थापासून बनविलेल्या पिशव्या) वापरून पर्यावरणपूरक उद्देशाने या पिशव्यात वाळू भरून त्या किनाऱ्यालगत एकावर एक रचल्या जाणार आहेत. यामुळे दबाव निर्माण होऊन बंधारा तयार करण्यात येणार आहे. हा बंधारा मजबुतीबरोबर तसाच कायम राहील तसेच या वाळू बंधाऱ्याला दगडी बंधाऱ्यापेक्षा खर्चही कमी येत असल्यामुळे तो परवडणारा आहे.
हेही वाचा - बदलत्या हवामानामुळे खरीपानंतर रब्बी पिकांच्याही नुकसानीची शेतकऱ्यांना भीती
केळवे समुद्रकिनारी ६०० मीटर लांबीचा बंधारा बांधण्यासाठी सुमारे ८५०० पॉली प्रोपोलिनने बनविलेल्या पिशव्या लागणार आहेत. प्रत्येक पिशवी ही दोन बाय दीड मीटरची असून त्यात ५०० किलोहून अधिक वाळू भरता येते. दगडी बंधाऱ्याला हा पर्याय असल्यामुळे डोंगर उत्खनन ही होणार नाही आणि पर्यावरणाची हानीही टळेल. प्रायोगिक तत्त्वावर पालघर तालुक्यातील केळवे समुद्रकिनारी याची सुरुवात झाली आहे. असा प्रायोगिक तत्वावर वाळूचा धूप प्रतिबंध बंधारा बांधण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. यामुळे किनाऱ्यांची धूप होणार नाही असा विश्वास बंधाऱ्याचे काम करणारे ठेकेदार निमील गोयल व पतन विभागाच्या अभियंत्यांचा आहे.
हेही वाचा - पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची 'एकला चलो'ची भूमिका?
राज्यात मंजूर झालेल्या ४९ दगडी बंधाऱ्याना न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश दिल्याने केंद्र शासनाने मच्छीमारांच्या घरांना धडकणाऱ्या लाटांना थोपवून धरण्यासाठी प्रायोगिक तत्वावर वाळूचे बंधारे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट् प्रयोग म्हणून केळवे येथे बंधारा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. केंद्र शासनाने या बंधाऱ्यासाठी २ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. वाळूचा बंधारा उभारणीचा हा राज्यातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट् असल्याचे पतन विभागाचे अभियंते चोरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - नालासोपाऱ्यात फेरीवाल्यांचा पालिका अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
केळवे समुद्रकिनारा हा पर्यटकांसाठी प्रसिद्ध असून तो सलग असल्यामुळे पहिल्या दहा ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवताना केळवे समुद्रकिनाऱ्याची निवड करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर अशा प्रकारचे पर्यायी आणि कमी खर्चिक असलेले बंधारे बांधण्याचे काम सरकार हाती घेईल, त्यामुळे पर्यटनपूरक समुद्रकिनारे उभे राहण्यास मदत होणार आहे.