पालघर - तारापूर समुद्रकिनारी मच्छीमारीसाठी लावलेल्या जाळ्यात दोन फिनलेस पॉरपॉईझ ( Palghar Finless Porpoise Fish ) मासे अडकले. मच्छिमार जगदीश विंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोन्ही माशांची जाळ्यातून सुटका करून त्यांना सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले आहे.
अशा पद्धतीने करण्यात येते पारंपारिक मासेमारी -
पालघर जिल्ह्याला विस्तृत असा समुद्रकिनारा लाभला असून येथे मोठ्या बोटींमधून मासेमारी करण्यात येते. त्याचप्रमाणे काही पारंपरिक मच्छीमार समुद्रात काही दूरवर धरण जाळी उभारून त्याद्वारे मच्छीमारी करतात. या धरण जाळ्यांमुळे समुद्राला ओहोटी आल्यावर भरतीच्या पाण्याबरोबर आलेले छोटे-मोठे मासे या जाळ्यात अडकतात. अशा प्रकारे या जाळ्यांच्या माध्यमातून पारंपरिक मच्छीमार आजही मच्छीमारी करतात.
मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला फिनलेस पॉरपॉईझ -
तारापूर येथील मच्छीमार जगदीश पंढरीनाथ विंदे यांनी अशाच प्रकारचे धरण जाळे मच्छिमारीसाठी समुद्रात लावले होते. समुद्राला ओहोटी आल्यानंतर त्यांच्या या जाळ्यात दोन मासे अडकल्याचे व आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असल्याचे विंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निदर्शनास आले. मच्छिमार विंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या फिनलेस पॉरपॉईझ माशांची धरण जाळ्यातून सुखरूप सुटका करत केली. त्यानंतर दोन्ही फिनलेस पॉरपॉइज माशांना सुखरूप समुद्रात सोडून जीवदान दिले. समुद्राच्या पाण्यात जाण्याच्या काही वेळातच दोन्ही मासे समुद्रात विहार करत दिसेनासे झाले. विशेष म्हणजे 11 जानेवारी 2021 रोजी देखील विंदे यांच्या धरण पद्धतीच्या जाळ्यात अशाच प्रकारचा फिनलेस पॉरपॉइझ मासा सापडला होता. त्यावेळीही त्यांनी या माशाला सुखरूप समुद्रात सोडले होते.
फिनलेस पॉरपॉईझ -
फिनलेस पॉरपॉईझ जातीच्या माशाला लहान आकाराचा व्हेल मासा, गाधा मासा, असेही म्हटले जाते. या माशाची लांबी साधारणतः 1.2 ते 1.8 मीटर, तर वजन सुमारे ४५ किलोग्रॅमपर्यंत असते. प्रवासी पक्षांप्रमाणे हे समुद्री सस्तन प्राणीदेखील हिवाळ्याच्या वेळी भारतीय उष्णकटीबंधीय समुद्रात हिवाळ्याचा काळ घालवण्यासाठी येत असतात. हे मासे मुख्यतः उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर समुद्र, बाल्टिक समुद्रात, तसेच भारताच्या सागरी किनार्यावर आढळतात.
हेही वाचा - Rekha Kamat Passes Away : प्रसिद्ध अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन; माहिममध्ये घेतला अखेरचा श्वास