पालघर (वसई) - मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बापाणे नायगाव येथे वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे भीषण अपघात झाला. ही घटना आज सकाळी ६च्या सुमारास घडली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बापाणे येथील उड्डाणपुलावर सकाळी गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनर थेट मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगेत आला. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांची समोरा-समोर धडक झाली. या धडकेत चालक सुरजितसिंग सामरा (५२, रा. गुरुदासपूर, पंजाब) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वाहनांची धडक जोरात असल्याने वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. तर वाहनांमध्ये असलेले साहित्य रस्त्यावर पडले होते. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी मेंढवण खिंडीत टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये टेम्पोचालक आणि क्लीनर जखमी झाले हाते. तसेच जानेवारी महिन्यात मनोर नजिक चिल्हारफाटा येथे एका खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. यात एकाचा मृत्यू, तर 10 ते 12 जण जखमी झाले हाते.
हेही वाचा- मराठी भाषिकांचा यावर्षीही 'काळा दिन'; मराठी भाषिकांचा आवाज दडपण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न
हेही वाचा- काँग्रेसलाच मत द्या.. भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधियांची जीभ घसरली !