वसई (पालघर) - वसई पूर्वेकडील नवजीवन येथे तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर वालीव पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद अब्बुजर जुबेर खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्री निवास मेडीकल जवळ नवजीवन येथे मोहम्मद अब्बुजर जुबेर खान (वय ३६) यांच्या ताब्यातील होंडा अॅक्टिव्हा मोटार सायकल (क्र.एम एच ४८ बीजे २५१५) वरून गुटखा वाहतूक करत होता. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून विविध प्रकारचा गुटखा आणि दुचाकी असा एकूण ४२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
वसई पूर्वेकडील कामण येथेही गुटखा वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करुन हजारो रुपयांचा मुद्देमाल वालीव पोलिसांनी जप्त केला आहे. ड्रॅगर कंपनी येथे फैजअहमद मोहम्मद हाशिम शेख हा त्याच्या होंडा अॅक्टिव्हा मो.सायकल (क्र. एमएच४८ ए झेड -3841) वरून गुटखा वाहतूक करत होता. यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून गुटखा व दुचाकी असा एकूण ८३,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास चौगुले, यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली.