पालघर - टेंभोडे गावातील एका घराच्या चप्पल स्टॅन्डवर तस्कर प्रजातीचा साप आढळला. या प्रकाराने घरातील लोकांची तारांबळ उडाली. सर्पमित्राने सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
पालघरमधील टेंभोडे गावातील आशिष पाटील हे रात्रीच्यावेळी आपल्या घराच्या व्हरांड्यात बसले होते. त्यावेळी घराच्या पायऱ्यांजवळ असलेल्या चप्पल स्टॅन्डवर त्यांना हालचाल जाणवली. त्यांनी नीट पाहिले असता चप्पल स्टॅन्डवर साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेचच सर्पमित्राला पाचारण केले. सर्पमित्र भावेश पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हा साप पकडला.
तस्कर साप बिनविषारी..
'तस्कर' हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी आणि बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला 'ट्रिंकेट' म्हणतात. हा साप लांबीला साधारणपणे अर्धा ते १ मीटर व जाडीला १ इंचापर्यंत असतो. त्याच्या अंगावर पट्टे असतात. हे पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या व पांढऱ्या चौकोनांनी भरलेले असतात. छोटे उंदीर, पाली, सरडे, पक्ष्यांची अंडी, बेडुक इत्यादी या सापाचे खाद्य आहे. हा साप मुख्यत्वे पश्चिम घाट, दक्षिण भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळतो. छोटी जंगले, मानवी वस्त्यातील गव्हाणी, अडगळीच्या जागा या त्याच्या निवासाच्या आवडत्या जागा आहेत.