पालघर - हेडफोन लावून रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांना मीरा भाईंदरमध्ये वाहतूक पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. शनिवारी वाहतूक पोलिसांनी तब्बल 250 रिक्षा चालकांचे हेडफोन जप्त करून त्यांची चक्क होळी केली.
हेडफोन लावून गाडी चालवणे, हा कायद्याने गुन्हा आहे. दुसरीकडे हेडफोन लावलेला रिक्षा चालक आपल्या तंद्रीत प्रवाशांना भलत्याच ठिकाणी घेऊन जातात. त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा वादही झाले आहेत.
हेडफोनच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत वाहतूक पोलिसांनी शनिवारी मीरा भाईंदर परिसरात हेडफोन विरोधात धडक मोहीम हाती घेतली. रिक्षा चालवत असताना हेडफोन वापरणाऱ्या विरोधातील ही कारवाई आहे. प्रवाशांच्या असंख्य तक्रारीमुळे ही कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी दिली.