पालघर - जागतिक कर्करोग दिनानिमित्त आज पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पास्थळ येथे तंबाखू मुक्त शाळा व गाव हे अभियान राबविण्यासाठी शाळेच्या परिसरात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या आवारात रांगोळी काढून त्यावर गवताची होळी रचून तंबाखूच्या सेवनाने होणारा कर्करोगासारखा गंभीर आजार आणि विविध दुष्परिणाम दाखवणारे विविध संदेशात्मक कागदी फलक लावून जनजागृती करण्यात आली. शिक्षकांनी देखील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळेच्या तसेच गावाच्या बाहेर हे घातक पदार्थ हद्दपार करण्याची शपथ घेतली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुहास राऊत तसेच शिक्षक, विद्यार्थी, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते.
११ लाखांहून अधिकांना कर्करोगाची लागण
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अहवालानुसार तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी जवळपास ११ लाखांहून अधिक भारतीयांना विविध प्रकारच्या कर्करोगाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. जगभरात तंबाखूच्या सेवनाने होणाऱ्या कर्करोगाने सुमारे १५ टक्के भारतीयांचा मृत्यू होतो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे अनेक प्रकारची रसायने मानवी शरीरात प्रवेश करत असून यात प्रामुख्याने निकोटीन, हायड्रोजन सायनाईड, अमोनिया, आर्सेनिक, नेपथिलीन, कॅडियम, बुटेन आणि कार्बन मोनिक्साइड या सारख्या घातक रसायनांचा समावेश असतो. भारतात धुम्रपान विरोधी कायद्यासंदर्भात विविध तरतुदी करण्यात आलेल्या असूनही तंबाखूसोबतच गांजा, चरस आदी अमली पदार्थांकडे तरुण पिढी आकर्षित होत असून हे चिंताजनक आहे.