पालघर/विरार : विरार पश्चिमेकडील जेपी नगर परिसरात वाघ आढळल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली असून या परिसरात तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये या अफवेने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता वनविभागाकडून नागरिकांना दिसलेल्या वाघाचा शोध घेण्यासाठी या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
जेपी नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी त्यांना राहत्या परिसरात रात्रीच्या सुमारास वाघ निदर्शनास आला होता.. त्यांनी याबाबतची महिती वनविभागाला दिल्यानंतर वाघाच्या शोधासाठी मांडवी वन विभागाकडून पावले उचलली गेली आहेत. वनविभागामार्फत वाघाचा शोध घेण्यासाठी जेपी नगर तसेच आजू बाजूच्या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून आता कॅमेऱ्याच्या आधारे वाघाचा शोध घेतला जाणार आहे.
![परिसरात आढळलेले ठसे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-02-rumor-has-it-that-a-tiger-was-found-in-virar-vis-mhc10003_08052021231512_0805f_1620495912_780.jpeg)
वनविभागाकडून खबरदारीपर उपाय
दोन दिवसांपासून या परिसरात विरारचे वनपाल रामचंद्र कदम आपल्या टीमसह गस्त करत आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार, जेपी नगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वाघ किंवा विबट्या निदर्शनास आल्याची माहिती मिळाली.यानंतर त्यांनी या ठिकाणच्या पणावठ्याच्या जागी आठळलेल्या जनावरांच्या पायाचे ठसे घेतले आहेत. ते आपल्या वरिष्ठांना पाठवून तपास केला असता, हे ठसे बिबट्या सारख्या दिसणाऱ्या तरस जनावराचे असल्याची महिती मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांनी वाघ किंवा बिबट्या दिसल्याच्या अफवेला न घाबरण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. मात्र तरीही उपाययोजनेचा भाग म्हणून या परिसरात आम्ही ट्रॅप कॅमेरे लावले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.