पालघर - जिल्ह्यातील वाडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खंडेश्र्वरी नाका येथे खंडेश्र्वर शिवलिंग मंदिर आहे. तसे हे मंदिर पुरातन असून या परिसरात हे प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात येथे शिवभक्त मोठ्या भक्तीभावाने दर्शनासाठी येत असतात. तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्ताने येथे भक्तांनी गर्दी केली आहे.
या पुरातन मंदिराची देखभाल पुरातन खात्याच्या विभागाकडून केली जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात येते. तसा फलकही पुरातत्व खात्याकडून लावण्यात आला आहे.
मंदिरातील आतील भाग हा जुन्या कोरीव नक्षीयुक्त लाकडाचा आहे. मंदिराचा गाभारा हा खोलगट व दगडीय बांधकामात आहे. मंदिराच्या परिसरातील अंगणात नागदेवतेचे शिल्प असून हे मंदीर पांडवकाळीन आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी येथे यात्रोत्सव भरत असतो. मंदिराच्या परिसराजवळ जुनी विहीर आहे. पुरातन खंडेश्र्वरेच्या मंदिराचा ठेवा हा या शहराबरोबरच येथील जनतेचे श्रद्धास्थान आहे.