वसई (पालघर) वसईतील एका तरुण आणि तरुणीला फिरण्यासाठी कळंब समुद्र किनाऱ्यावर जाणे चांगलेच महागात पडले आहे. त्यांनी समुद्र किनाऱ्यावर पार्क केलेली चारचाकी समुद्राला आलेल्या भरतीमुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे.
समुद्र किनाऱ्यावर पार्क केली होती कार
वसईमधील एक तरुण आणि तरुणी दोघे कळंब समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. त्यांनी याच ठिकाणी रात्री मुक्कामाचा प्लॅन बनवला आणि आपली स्विफ्ट कार समुद्र किनाऱ्यावर पार्क केली. मात्र भरती आल्याने रात्रीच्या सुमारास ही चारचाकी वाहून गेली. सकाळी ते गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आले. मात्र गाडी जाग्यावर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गाडीचा शोध घेतल्यानंतर गाडी वाहून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही चारचाकी वाहत जाऊन भुईगाव किनाऱ्यावर अडकली. त्यानंतर तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, ही चारचाकी पाण्यामधून बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.