पालघर - पैसे नसल्याने मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका नाकारल्याने एका पित्याला आपल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह दुचाकीवर घरी नेण्याची वेळ आल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे घडला आहे. पित्याला मुलाचा मृतदेह दुचाकीवरून 30 किलोमीटरहून अधिक प्रवास करून घरी न्यावा लागला आहे.
देश 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना पालघर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. जव्हार मधील पायरवाडी येथील अजय पारधी या सहा वर्षीय चिमुकल्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र त्यानंतर रुग्णवाहिकेला देण्यासाठी पैसे नसल्याने मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका नाकारण्यात आली. युवराज पारधी यांनी आपल्या चिमुकल्याचा मृतदेह घेऊन 30 किलोमीटर हून अधिक अंतर पार करत आपलं घर गाठले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. देश डिजिटल इंडिया कडे वाटचाल करत असताना मुंबईलगत असलेल्या पालघरमध्ये मात्र आजही आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे.