पालघर - कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर राज्य सरकार नाखूष आहे. केंद्राने अचानक घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असताना निर्यातीवर घातलेली बंदी चुकीची आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली. आज पालघर दौऱ्यावर आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या निर्णयावर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील सुरू केले आहे.
केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे आता कांदा प्रश्नावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.