पालघर - महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन तरतुदीत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
शासनाने माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच असलेल्या 1981 च्या नियमावलीत बदल करून, नियम 7(1)(2) मध्ये दुरुस्ती केली आहे. यामुळे फक्त माध्यमिक कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्त्यासाठी राज्य शासनाच्या मर्जीवर अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र, इतर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या तरतुदींनुसार वेतन भत्ते मिळणार आहेत. शासनाच्या या धोरणाचा तसेच घटना दुरुस्ती विधेयकाचा विरोध करण्यासाठी पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक संघाने जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
दुरुस्तीचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलनानंतर शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागेल, असे संघटनेचे अध्यक्ष पी. टी पाटील यांनी सांगितले. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे कार्यवाह-गणेश प्रधान, पतपेढी अध्यक्ष-संतोष पावडे तसेच शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष प्रकाश वर्तक, व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांसह अनेक शिक्षक सहभागी झाले होते.