पालघर - दमण येथील समुद्रात तटरक्षक दलाल शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एक संशयित बोट आढळली होती. यानंतर पालघर तसेच गुजरातच्या तटाजवळील समुद्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली. तसेच किनाऱ्यालगतच्या भागांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान, संबंधित संशयित स्पीडबोटचा शोध लागला असून, 'इंडियन व्हेसेल ऑफ गुजरात'ची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दमण येथे समुद्रात एक स्पीडबोट दिसून आली आणि लगेच दिसेनासी झाली. रात्रीची वेळ असल्याने तिचे वर्णन करता आले नाही. तसेच स्पीड बोट कोणत्या दिशेने गेली, या बाबत माहिती प्राप्त झाली नव्हती.
भारतीय तटरक्षक दलाने संबंधित माहिती तारापूर अणुऊर्जा प्रकल्प प्रशासन आणि पालघर जिल्हा पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी त्वरित हालचाली सुरू करून अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यासह सर्व किनाऱ्यालगतच्या भागात शोध मोहीम हाती घेतली.
भारतीय तटरक्षक दलाशी योग्य समन्वय साधून सागरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मच्छिमार, सागर रक्षक दल तसेच ग्रामस्थांना माहिती देऊन त्यांच्या मदतीने समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवले. भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात केलेल्या या शोध मोहिमेत ही संशयास्पद स्पीडबोट सापडली असून, ती 'इंडियन व्हेसेल ऑफ गुजरात'ची असल्याचे निष्पन्न झाले आहे.