पालघर- समाज कल्याण विभागाच्या विक्रमगड येथील विक्रमशाह या अनुदानीत वसतिगृहात राहणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनंता तुळशीराम वायात असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पालघरमध्ये वसतीगृहात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा अजूनही रामभरोसे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
अनंता हा विक्रमगड मधील खुडेद महालपाडा येथील रहिवासी होता. तो विक्रमगड येथील शाळेत सातवीत शिक्षण घेत होता. मात्र, काल रात्री वसतीगृहात असताना 1 वाजेच्या सुमारास त्याला अचानक उलटी झाली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचार सुरू असताना अनंताचा 4 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने अनंताचा मृत्यू झाल्याचा आरोप अनंताच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, अनंताच्या मृत्यूनंतर समाज कल्याण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.