पालघर - वरखुंटी परिसरात अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 85 हजार 572 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक केली आहे.
८५ हजार ५७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त
पालघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या वरखुंटी परिसरात अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. या छाप्यात तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. या ठिकाणावरून 85 हजार 572 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एका आरोपीला अटक
अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, ब्रिजेश राजेंद्र शाहू (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात भादविस कलम १८८, २२९, २७० व अन्न सुरक्षा अधिनियम २००६ कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.