पालघर( वसई/विरार) - गेल्या चार दिवसात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात माणसांसह मुक्या जनावारांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. अनेक सापांच्या बिळात पावसाचे पाणी शिरले तर वादळी वाऱ्याने अनेक पक्षांची घरटी तुटल्याने त्यांनी आसऱ्यासाठी मानवी वस्तीत धाव घेतल्याचे दिसून आले आहे. अशा विविध साप आणि पक्ष्यांना सर्पमित्र सूरज पांडे यांनी सुरक्षितपणे वाचवले आहे.
५०हून अधिक साप, पक्ष्यांना जीवदान
सर्पमित्र सूरज पांडे यांनी वेगवेगळ्या परिसरातील मानवी वस्तीतून तब्बल ५०हून अधिक वेगवेगळ्या जातीचे विषारी व बिनविषारी साप व पक्षी त्याने रेस्क्यू केले आहेत. यामध्ये नाग, घोणस, हरीणटोळ अशा विविध जातींचे साप असून एक घुबड आणि काही पक्ष्यांचाही समावेश आहे. पावसामुळे परिसरात सर्वच ठिकाणी पाणी साचले असल्याने अनेक साप बिळातून बाहेर पडत मानवी वस्तीत आडोसा घेत आहेत. त्यामुळे असे साप आढळल्यास त्यांना न मारता याची माहिती प्राणीमित्रांना द्यावी आणि त्यांचा जीव वाचवावा असे आवाहन प्राणीप्रेमींमधून केले जात आहे.