पालघर - नालासोपाऱ्यातील पश्चिमेकडील श्रीप्रस्था परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीमुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, सध्या या परिसराला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप आले आहे.
या भागात मोठी नागरी वस्ती आहे. या वस्तीतून गेलेल्या चौथ्या रस्त्याच्या बाजूस मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य आहे. तसेच गॅरेज मालकांची गंजून गेलेली वाहने देखील याच ठिकाणी टाकली असल्याने पादचाऱ्यांना अडचण होत आहे. मागील काही महिन्यांपासून हा कचरा न उचलल्याने त्याची दुर्गंधी आजूबाजूच्या परिसरात पसरत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हेही वाचा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत कचऱ्यावरुन राजकारण सुरु
मात्र, वसई-विरार महापालिकेच्या स्वच्छता विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. कचरा व बेकायदेशीरपणे उभी करण्यात आलेली वाहने उचलून परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.