पालघर - बोईसर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी दरम्यान शिवसेनेचे विलास तरे विजयी झाले, अशी बातमी शिवसैनिकांमध्ये पसरली. शिवसैनिकांनी मतमोजणीचा अंतिम निकाल समोर येण्याआधीच उमेदवाराला खांद्यावर घेत जल्लोष केला. मात्र, अंतिम निकाल हाती आल्यावर शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील विजयी झाले असल्याचे घोषित झाले. त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राजेश पाटील यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष सुरू केला. शिवसेनेच्या उमेदवार विलास तरे यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. विलास तरे व शिवसैनिकांचा जल्लोषाचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. व्हिडिओ माध्यमातून बोईसर मतदारसंघात 'जिंकले कोण नाचले कोण' 'विजयी झाली बहुजन विकास आघाडी आणि नाचली शिवसेना' अशी चर्चा सुरू समाज माध्यमांमध्ये सुरू असून सर्वत्र एकच हशा पिकला आहे. शिवसैनिकांसाठी 'अति घाई संकटात नेई' ही म्हण देखील काहीशी खरी ठरली आहे.
बोईसर विधानसभा मतदारसंघावर बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखत राजेश पाटील यांनी विजय मिळवला आणि सलग तिसऱ्यांदा बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकवला आहे. यामुळे निवडणुकांच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीतून शिवसेनेत प्रवेश केलेले, शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांचे हॅट्रिक साधण्याचे स्वप्न भंगले आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार संतोष जनते यांनी बंडखोरी केल्यामुळे येथे भविष्याचे राजेश पाटील विरुद्ध शिवसेनेचे विलास तरे विरुद्ध भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार संतोष असा तिरंगी सामना पाहायला मिळाला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये पारडे फिरले आणि सुरुवातीपासून आघाडीवर असणारे शिवसेनेच्या विलास तारे यांचा बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांनी अवघ्या 2 हजार 752 मतांनी पराभव करत विजय मिळवला.