पालघर - राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 39 वर पोहोचली आहे. त्यामुळे याचे गांभीर्य ओळखून पालघरमध्ये कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व धार्मिकस्थळे, समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, जलतरण तलाव, किल्ले इत्यादी ठिकाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग झालेला पॉझिटिव्ह रुग्ण सध्यस्थितीत आढळून आलेला नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.
हेही वाचा - कोरोनाच्या अफवेचा पोल्ट्री व्यावसायिकांना फटका, २०० रुपये प्रतिकिलोची कोंबडी १० रुपयाला
संसर्गित देशातून प्रवास करुन आलेल्या परदेशी प्रवाशांच्या संपर्कात निरोगी व्यक्ती आल्यास कोरोना विषांणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे झाई, बोर्डी, डहाणू, शिरगाव, सातपाटी, केळवा, अर्नाळा, व इतर सर्व समुद्र किनारे, महालक्ष्मी मंदिर संस्थान विवळवेढे, जिवदानी माता संस्थान विरार, शितला देवी केळवा, इको विलेज (इस्कॉन), गालतरे, शनिमंदीर वाघोजी, सादनंदबाबा आश्रम तुगारेंश्वर व जिल्ह्यातील इतर सर्व धार्मिक स्थळे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. यासोबतच ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, वसतीगृह तसेच कोचिंग क्लासेसही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - #कोरोना : चार संशयितांच्या चाचण्या निगेटिव्ह; पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपायायोजना