पालघर - सातपाटी पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर सातपाटी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त केला आहे. शिरगाव ग्रामपंचायतीतील ऊसबाव येथे एका निर्जन स्थळी हा गैरप्रकार सुरू होता. या कारवाईत पोलिसांनी सुमारे २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सातपाटी पोलिसांना ऊसबाव येथे बेकायदेशीर हातभट्टीची दारू बनविण्याचाचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सातपाटी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास या ठिकाणी धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू बनवण्याचा अड्डा सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल आपल्या ताब्यात जप्त केला असून दारूचा अड्डा उध्वस्त केला आहे. हातभट्टीचा अड्डा चालवणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपाटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे.