पालघर - जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या गणेश दामू भोर यांचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गणेश भोर हे 70 टक्के भाजले होते. त्यांच्यावर पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर मुंबई येथे हलविण्यात होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
नालासोपारा सेंट्रल पार्क येथील रहिवासी गणेश दामू भोर या रिक्षाचालकाने नालासोपारा येथे एका बिल्डरकडून सदनिका विकत घेतली होती. त्या मोबदल्यात त्याने 8 लाख रुपये बिल्डरला दिले होते. मात्र, बिल्डरने सदनिकेचा ताबा न देता ही सदनिका परस्पर दुसऱ्याला विकली. याप्रकरणी गणेश दामू भोर यांनी अनेकवेळा पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी त्यांच्या फसवणुकीबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी गणेश भोर यांनी न्यायालयाकडेही दाद मागितली होती. न्यायालयाने ही रक्कम त्याला देण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे 6 लाख रुपये बिल्डरने गणेश यांना डिमांड ड्राफ्टने दिले. मात्र, उर्वरित 2 लाख मिळत नसल्याने गणेश हताश झाले होते. वारंवार पोलीस ठाण्याच्या चकरा मारूनही त्यांना हे पैसे प्राप्त होत नव्हते.
हेही वाचा - पालघरमध्ये भाजपच्या दोन गटात राडा; नवरात्रोत्सवाच्या भर स्टेजवर झाली झटापट
या प्रकरणी गणेश भोर गुरुवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात काही पत्र घेण्यासाठी आले होते. मात्र, कागदपत्रांच्या मूळ प्रती अपेक्षित असल्याने त्यांच्याकडे तशी मागणी करण्यात आली. यानंतर त्यांनी आपली पत्नीला फोन करून ही मूळ कागदपत्रे मागवली. मात्र, ही सर्व कागदपत्रे घेऊन पत्नी जिल्हाधिकारी कार्यलयात पोहोचण्याआधीच गणेश भोर यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव यांच्या दालनात हा प्रकार घडला. गणेश यांना वाचवण्याच्या प्रयत्नात उपजिल्हाधिकारी यांच्या हाताला जखम झाली आहे. स्वतःला पेटवून घेताना गणेश भोर हे 70 टक्के भाजल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - नालासोपारा मतदारसंघासाठी 'बविआ' आणि 'शिवसेना' उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल