पालघर - मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करण्यासाठी पालघर मधील वाडा तालुक्यातील ओंगदा गावात गारगाई प्रकल्पाचे धरण बांधले जाणार आहे. या धरणासाठी याठिकाणची पाच महसुली गावे विस्थापित होणार आहेत. आपले गाव सोडताना पुनर्वसना ठिकाणी पायाभूत सुविधांबरोबरच इतर सुविधा आणि आपल्या मागण्या पुर्ण करव्यात, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जातेय.
यावेळी ओंगदा गावातील प्रकल्पग्रस्तांनी मुलांच्या शिक्षणाची सोय, आरोग्य, नोकरी, जमीन या सारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्यांसाठी जोर लावला आहे. आधी पुनर्वसन मगच विस्थापन करा, अशी आग्रही मागणी करून ज्याठिकाणी विस्थापन होणार आहे, त्याठिकाणी या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तरच गाव सोडू, असा पाविञा प्रकल्पग्रस्तांकडून घेतला जात आहे.
हेही वाचा - 'पाणी आमच्या रानाचं पण शिवून न्हाय देत आम्हाला'
पालघर जिल्हय़ातील वाडामधील ओंगदा ग्रामपंचायतीच्या हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठ्यासाठी गारगाई धरण बांधण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील ओगदे, खोडदे, फणसगांव, तीळमाळ आणि पाचघर ही महसुली गावे बाधित होणार आहेत. पुनर्वसनासाठी जागा, पायाभूत सोयी सुविधा, नोकरी आणि इतर मागण्या पुर्ण कराव्यात तरच प्रक्ल्पाला जागा देण्याचा निर्णय या गावातील लोकांनी घेतला आहे. बाधित ठिकाणी असलेल्या सोयी सुविधापेक्षा पुनर्वसनाच्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा - वाढवण बंदर मंजुरीबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाच्या फलकावर निषेध म्हणून फासले काळे
बाधित क्षेत्राचे पुनर्वसन हे वाडा तालुक्यातील वनविभागाच्या जागेत केले जाणार आहे. या जागेची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पग्रस्तांनी केल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. यावेळी पुनर्वसनासाठी जागा, पायाभूत सोयी सुविधा, घर, नोकरी यासारख्या मागण्यांबरोबरच इतर मागण्याही पुर्ण केल्या जातील, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे भुसंपादन कक्ष अधिकारी (उपजिल्हाधिकारी) एस. पगारे यांनी पालघर येथील या संदर्भातील एका बैठकीत बोलताना सांगितले.