पालघर - शिवसेनेचे आमदार रविंद्र फाटक यांच्या गाडीत रोकड रक्कम असल्याची तक्रार करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फाटक यांची गाडी जवळपास 3 तास अडवून ठेवली. तेव्हा निवडणूक आयोगाने गाडीची तपासणी केली असता फाटक यांच्या गाडीत 65 हजाराची रक्कम बंद लिफाफ्यात आढळून आली. त्यामुळे फाटक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार रविंद्र फाटक पालघर लोकसभेचा आढावा घेण्यासाठी मतदारसंघात फिरत होते. तेव्हा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीत पैसे असल्याचे सांगत गाडी अडवून ठेवली. फाटक यांच्या गाडीची तपासणीची करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत नालासापोरा पूर्वमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांसह निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने महत्वपूर्ण भूमिका बजावात वातारण शांत केले.
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आमदार फाटक यांच्या गाडीत लिफाफ्यात असलेली 64 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. फाटक यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिवसेना व बाविआ कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाची प्रकरणी वसई विरारचे महापौर रुपेश जाधव यांच्यासह बहुजन विकास आघाडीच्या 60 जणांविरोधात आयपीसी. 143, 341, 323 नुसार तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
यावर काय म्हणाले रवींद्र फाटक -
उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसईतील गुंडगिरी संपवण्यासाठी दिलेल्या आवाजाला जनतेचा चांगला प्रतिसाद भेटत आहे. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच विरोधक जमाव जमा करून दहशत निर्माण करण्याचे कृत्य केले जात असल्याचे फाटक म्हणाले.
गाडी फोडण्याची गुंडगिरीची भाषा महापौर करत आहेत, त्यामुळे महापौरसकट त्यांच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली असल्याचे फाटक म्हणाले. ठाकुरांच्या या गुंडगिरीला यापुढे शिवसैनिक जशाच तसे उत्तर देतील, असेही आमदार रविंद्र फाटक यांनी प्रसारमाध्यमांशी सांगितले.