पालघर - अवघ्या काही दिवसांवर राज्याच्या विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष सध्या आपल्या प्रचारासाठी सोशल मीडिया आणि नव्या मार्गांचा अवलंब करत आहेत. 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा शिवसेनेकडून नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे प्रदिप शर्मा यांच्या प्रचारासाठी रॅप गाणे तयार करण्यात आले आहे. हे गाणे सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
सोशल मीडियावर शर्मा यांच्या प्रचारासाठी ‘शेर आया..शेर आया..' या गाण्याच्या माध्यमातून तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस व काँग्रेसनेही अशाच प्रकारे रॅप गण्याच्या माध्यमातून तरूण वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा - पालघर - बोईसर रस्ता रुंदीकरणासाठी पडणार २९१ झाडांवर कुऱ्हाड
'शेर आया.. हर मसलोंका हल लाया..’ अशा शब्द रचनेच्या माध्यमातून प्रदीप शर्मांचे व्यक्तिमत्त्व आणि विरार, नालासोपाऱ्यातील स्थानिक समस्यांची दृश्ये यामध्ये दाखवण्यात आली आहेत. मतदारसंघातील अनधिकृत बांधकाम, वाहतुकीची समस्या, दर पावसात निर्माण होणारी पूरपरिस्थिती, पाणीप्रश्न अशा सर्व प्रश्नांना या गाण्याच्या माध्यमातून हात घालण्यात आला आहे. तसेच प्रदीप शर्मा यांच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे गाणे नालासोपारा मतदारसंघातील मुलांनीच गायले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली. प्रदीप शर्मा यांच्यासमोर विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांचे आव्हान आहे.