वसई (पालघर) - वालीव पोलीस ठाण्यातील कार्यरत एका पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. या घटनेमुळे वालीव पोलीस ठाण्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, याआधीही वालीव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
प्रभाकर खोत (५५), असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. एक वर्षापूर्वी त्यांची वालीव पोलीस ठाण्यात बदली झाली होती. याआधी ते रायगड जिल्ह्यात कार्यरत होते. मागील काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सुट्टीवर गेले होते. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार होता. शनिवारी त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी पनवेलच्या उन्नती रुग्णालयात दाखल केले होते. तपासणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. रविवारी सायंकाळी त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण पालघर जिल्ह्यातील पोलिसांवर शोककळा पसरली आहे.