वसई (पालघर) - वसई-विरार परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महापालिकेत सक्षम वैद्यकीय अधिकारी नाही. सदर पदावर सरकारकडून वैद्यकीय अधिकारी मिळवून देऊ,असे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी वसईत बोलताना दिले. करोनाचा आढावा घेण्यासाठी दरेकर यांनी वसईत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त गंगाथरन, प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे,तहसीलदार किरण सुरवसे,महापौर प्रवीण शेट्टी यांच्यासह महापालिका अधिकारी, वैद्यकीय अधिकारी हजर होते. यावेळी बोलताना त्यांनी समक्ष वैद्यकीय अधिकारी मिळावा, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावून असे आश्वासन दिले.
हेही वाचा... राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५२ टक्के - आरोग्यमंत्री
आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाच्या हेळसांडपणामुळे होणाऱ्या रुग्णांचा मृत्यूला राज्य सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे. तर खाजगी हॉस्पिटल मधून होणारी रुग्णांची लूट थांबवली पाहिजे. सरकारच्या नियमानुसार हॉस्पिटल काम करत नाहीत. सरकार मृत आणि रुग्णांचे आकडे लावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या व्यवस्थेत बदल झाला नाही तर भाजपला टोकाचे आंदोलन करावे लागेल, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी बोलताना दिला. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका, मनुष्यबळ वाढवून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आहेत, अशी माहितीही दरेकर यांनी दिली.
महापौर प्रवीण शेट्टी यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पत्रकार संघटनेकडून आणि अनिलराज रोकडे, संदीप पंडित यांनी आयुक्त करत असलेल्या अवमानाच्या तक्रारी दरेकर यांच्यापुढे करण्यात आल्या. त्यावेळी शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात संवाद समन्वय असला पाहिजे. पत्रकारांचाही अवमान होता कामा नये, याबाबतीत लोकप्रतिनिधी आणि पत्रकाऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.
प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांची संघर्ष केल्यावर शहराचे वाटोळे झाल्याचे अनुभवलेले आहे, असे परखड मत दरेकर यांनी व्यक्त केले. लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचा अवमान करता येणार नाही. समन्वयाची भूमिका घेऊन लोकप्रतिनिधींच्या बैठका घ्या. त्यांना विश्वासात घेऊन काम करा, अशा सूचना आयुक्तांना केल्याचे दरेकर यांनी सांगितले.