पालघर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही वारंवार सूचना देऊनही नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसत आहे. आता पालघरमध्ये पोलीस प्रशासनामार्फत घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर ड्रोनच्या साह्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गर्दीच्या ठिकाणी सोशल डिंस्टन्स पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. तरीही अनेक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात विनाकारण रस्त्यांवर फिरताना अथवा इमारतींच्या टेरेसवर गर्दी केलेले दिसतात. अशा गर्दीच्या ठिकाणी व इतर भागात नागरिकांवर आता पालघर पोलीस ड्रोणच्या सहाय्याने नजर ठेवणार आहे. तर नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालघर पोलिसांनी सांगितले आहे.