नालासोपारा (पालघर) - नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस निरीक्षकांच्या दालनातच स्वतःला बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सखाराम भोये वय वर्ष (वय 42 वर्षे), असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते हवालदार पदावर कार्यरत होते. आत्महत्येचे कारण अज्ञाप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अनेक प्रश्न उपस्थित
नालासोपारा पूर्वे रेल्वे स्थानक परिसरात तुळींज पोलीस ठाणे आहे. बुधवारी (दि. 23 डिसें.) मध्यरात्री तीन ते चार वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातील रेस्ट रुममध्ये जाऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकाराबाबत संपूर्ण पोलीस ठाणे अनभिज्ञ होते. जेव्हा सकाळी पोलीस निरीक्षकांच्या दालनात महिला सफाई कर्मचारी साफसफाई गेली. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सखाराम भोये यांच्या आत्महत्येच नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नसेल तरी पोलीस ठाण्यातच केलेल्या आत्महत्येने ते मानसिक तणावात होते का? किंवा वरिष्ठांच्या जाचास कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पोलीस दलात खळबळ
मागील चार वर्षांपासून पालघर पोलीस दलात सखाराम भोये कर्तव्य बजावत असून ते तुळींज पोलीस ठाण्यात हवालदार या पदावर कार्यरत कार्यरत होते. त्यांनी उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व पत्नी, असा परिवार आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : पालघरमधील 40 कोरोना योद्ध्यांचे दोन महिन्यांचे मानधन थकीत
हेही वाचा - गडचिंचले तिहेरी हत्याकांड : आणखी २४ आरोपींना सीआयडीने केली अटक; ५ अल्पवयीनांचा समावेश