पालघर - सफाळे पोलिसांनी मटका जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई केली. अशोक बाळु वाघेला, दीपक वाघेला अशी आरोपींंची नावे आहेत. या कारवाईत ३४ हजार ८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सफाळे, चाफानगर येथे एक व्यक्ती हा त्याच्या राहत्या घरात मटका बिटिंगच्या नावावर लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सफाळे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, अशोक बाळु वाघेला, दीपक वाघेला हे दोन आरोपी त्यांच्या राहत्या घरात मटका जुगार खेळत व खेळवत असताना आढळून आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ३४ हजार ८४० रुपये व मटका जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले आहे. या आरोपींविरोधात सफाळे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.