पालघर – कोरोना महामारीने नागरिक त्रस्त असताना मोटारसायकल चोरून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नमवर मेहबुबु शेख असे 19 वर्षीय संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ लाख ५ हजार किमतीच्या मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
नालासोपारा पूर्व परिसरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकलींच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यांना आळा घालण्याकरता पालघरचे पोलीस अधीक्ष दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक वसई विभाग, विजयकांत सागर व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांना चोरीच्या घटनांना पायबंद बसविण्याकरिता तपास करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीला जेरबंद केले.
संशयित आरोपी नमवर मेहबुबु शेख (वय १९ वर्ष, रा. नालासोपारा) याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. आरोपीने तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानीव नालासोपारा पुर्व, वसई (प)व पूर्व परिसरात एकूण ४ ठिकाणी मोटारसायकल चोरींचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्याकडून १ लाख ५ हजार किमतीच्या मोटारसायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) जे.जी वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.