पालघर - बोईसर येथील चिन्मय रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत चौधरी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रकांत चौधरी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना बोईसर येथील चिन्मय रुग्णालयामधील सामान्य वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळच्या सुमारास चंद्रकांत चौधरी यांनी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने गंभीर जखमी झालेल्या चौधरी यांना रुग्णालयामध्ये दाखल करून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: डहाणू- घोलवडच्या चिकू फळावरील बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी हवालदिल
चंद्रकांत चौधरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी बोईसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.