वसई(पालघर) - वसईतील कोविड सेंटरमधून 80 वर्षीय रुग्ण गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना समोर आली आहे. कोणी कुटुंबीय सोबत नसल्याने घरी एकटेच राहत असलेल्या या रुग्णाला त्याच्या शेजाऱ्यांनी 22 एप्रिलला वसई पूर्वेकडील वरूण इंडस्ट्री येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.
त्यांचा 14 दिवसांचा उपचाराचा कालावधी संपला तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी या रुग्णाचा कोविड सेंटरमध्ये शोध घेतला असता त्यांना रुग्णाचा काहीच पत्ता लागला नाही. त्यांच्या शोधासाठी रुग्णाच्या परिसरात राहणारे समाजसेवक नरेंद्र पाटील पाठपुरावा करत आहेत. मात्र, दहा दिवस उलटूनही महापालिकेकडे रुग्णाची कोणतीच महिती नसल्याने त्यांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराबाबत वसई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. किशोर गवस यांकडे माहिती घेतली असता त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार देत याबाबत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा - बोईसरमधील तुंगा कोरोना रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण