पालघर (वाडा) - तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी गाव पाड्यात पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी टंचाईच्या कृती आराखड्यातून बोअरवेल प्रस्तावित होती. मात्र, ही बोरवेल न मारल्यामुळे पंचायत समिती सदस्या माणिक म्हसरे यांनी वाडा पंचायती समोर १९ जुनला आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.
वाडा तालुक्यातील परळी, गारंगाव या भागातील ग्रामपंचायत आखाड्यातील वडवली, घोडीचा पाडा, उज्जैनी मधील विऱ्हे, वरसाळे मधील वांगडपाडा, ओगदा, पालघर, फणसपाडा आणि परळी या भागातील आदिवासी गावपाड्यात पाणी टंचाई आराखड्यात 8 बोरवेल मारल्या गेल्या नाहीत. या भागात पाणीटंचाई असताना ऐन पावसाळा येऊन ठेपला तरी पाणी पुरवठा विभागाकडून बोअरवेल मारल्या न गेल्याने निधी यावर्षी खर्चाविना पडून राहणार आहे. गावकरी बोअरवेल मारण्याचा तगादा लावतात. मात्र, इथले प्रशासन चालढकल करत असल्याचा आरोप पंचायत समितीचे सदस्य माणिक म्हसरे यांनी तक्रार निवेदनात केला आहे.
बोरवेल मारण्यासाठी जाणारा रस्ताही इथल्या गावकऱ्यांनी श्रमदानातून तयार केला. मात्र, बोरवेल ठेकेदार गाडी जाणार नाही, असे सांगून यावर टाळाटाळ करत असतात असे वाडा पंचायत समितीचे सदस्य माणिक म्हसरे यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले.