पालघर- सरकार कर्जमाफी करून थकीतांना प्रोत्साहन देते. पण दागिने गहाण ठेवून सोसायटी भरणाऱ्या शेतकर्यांचे यात काही हित होत नाही. यापुढे अशा कर्जमाफीमुळे सेवा सहकारी सोसायट्या बंद पडतील, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून नियमित कर्जे भरणाऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान द्यावे, असे मत या शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकरीवर्गाला 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीमुळे थकबाकीदार शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला. मात्र, सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहर्यावर सध्या निराशा पसरली आहे.
आम्ही काबाडकष्ट करून गावात इभ्रतीचा प्रश्न म्हणून घरातील दागिने मोडून कर्ज भरत असतो. परंतु, सरकार वर्षानुवर्षे कर्ज थकविणाऱ्या शेतकरीवर्गाला कर्जमाफी देते. त्यांना कर्जमाफी जरूर द्यावी. मात्र, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरीवर्गाला सरकारने दिलासा मिळेल अशी काही मदत करावी.
आजवर नियमित शेतकरी कर्जे भरणाऱ्या शेतकरीवर्गाच्या आधारावरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सोसायट्या चालतात. थकीतांची जर कर्जमाफी होत असेल तर आम्ही सोसायटीचे कर्ज नियमीत भरणाऱ्या शेतकऱ्यांनी गुन्हा केला आहे का, असा उद्विग्न सवाल शेतकरी या कर्जमाफीवर करीत आहेत. याबाबत सरकार नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याची भूमिका होती. अवकाळी पावसाने होरपळलेल्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, आता प्रत्यक्षात हे दिसत नाही. महापुरात व अवकाळी पावसात शेतकरीवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी भरीव मदत मिळत नाही. मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
कर्जमाफीबाबत नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकरीवर्गाला शासनाने लवकरच प्रोत्साहन अनुदान द्यावे. अन्यथा यापुढे कर्ज भरणार नाही, अशीही भूमिका पालघर जिल्ह्यातील दशरथ हरी पाटील, दामोद पदू पाटील, सदानंद बाबू पाटील, पंढरी रामचंद्र पाटील, सुधाकर जगन पाटील, रवींद्र विठ्ठल पाटील आणि रमेश ठाकरे या शेतकऱ्यांनी घेतली आहे.