पालघर- कोरोनाकाळात बंद असलेली मंदिरे आजपासून भाविकांसाठी खुली झाली आहेत. मंदिरे उघडण्यासाठी भाजपाकडून अनेक आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजनात्मक अटी नियम घालून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीला आलेली ही सुबुद्धी भाजपच्या आंदोलनामुळेच आली असल्याचा टीका पालघर भाजपचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केली आहे.
ढोल ताशा वाजवून जल्लोष-
राज्य सरकारने राज्यातील मंदिरे आणि धार्मिकस्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजपासून सर्वच मंदिराची दारे दर्शनसाठी उघडली आहेत. मात्र, सरकारच्या निर्णयावरून भाजपने श्रेय लाटण्यासाठी भाजपच्या आंदोलनाचा परिणाम असल्याचा दावा केला आहे. पालघर जिल्ह्यातील वाडातालुक्यातील तिल्सेश्वर महादेवाच्या मंदिरात मंदिरे खुली करण्यासाठी भाजपने आंदोलन केले होते. त्यानंतर आज भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मंदिरात जाऊन आरती केली. तसेच ढोल ताशा वाजवून मंदिर उघडल्याचा जल्लोषही साजरा केला.
तिल्सेश्र्वर मंदिरात भजन-
कोरोना रोखण्यासाठी मंदिरे काही काळ बंद होती. त्यानंतर राज्यात अनलॉक सुरू झाले. हॉटेल, बार सुरू झाले. मात्र मंदिर खुली करण्याचा कोणताही निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही. त्यामुळे राज्यात भाजपने सर्वत्र मंदिर उघडण्यासाठी आंदोलने सुरू केली होती. याच पार्श्वूमीवर पालघर जिल्ह्यात वाडा येथील तिल्सेश्र्वर या मंदिरात भजन गाऊन भाजपने आंदोलन केले होते. मात्र, आता भाजपच्या आंदोलनाला यश आले आहे. आमच्या आंदोलनामुळे सरकारला मंदिरे उघडण्याची सुबुद्धी सुचली, अशी टीका पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केली.