पालघर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांसाठी फसवी कर्जमाफी योजना राबवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. या सरकारच्या कार्यकाळात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. महिला सुरक्षेबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत भाजपकडून मंगळवारी पालघर तहसीलदार कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकार विरोधात एल्गार पुकारत धरणे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा सर्व पदांचा राजीनामा
भारतीय जनता पक्षाचा विश्वासघात करून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. परंतू राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला शेतकरी आणि महिला अत्याचारांवरील प्रश्नांवर धारेवर धरत भाजपकडून निदर्शने करण्यात आली. या धरणे आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा - मीरा भाईंदरमध्ये हेडफोन वापरणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई
पालघर जिल्ह्यात नारळावर पांढरी माशी किडीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणेबाबत कार्यवाही झाली नाही. मच्छीमारांची सध्याची बिकट परिस्थिती लक्षात घेता, ताबडतोब दुष्काळ जाहीर करून मच्छीमारी बंदी कालावधीत खावटी पद्धत चालू करण्यात आली नाही. पणेरी नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी आणि तारापूर औद्योगिक क्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे नियोजन करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले.