पालघर - पोटगी प्रकरणात न्यायालयात हजर होत नसल्यामुळे जामीनदाराने आपला जामीन काढून घेतला. याचा राग धरून आरोपी संतोष यशवंत शेंडे (वय 37) याने जामीनदार नारायण लक्ष्मण बेंडगा याच्यावर राहत्या घरी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. 18 डिसेंबरला ही घटना घडली.
याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड पोलीस आरोपीस अटक करण्यासाठी जात होते. यावेळी आरोपीने पोलिसांवर काडतुसे (गावठी बॉम्ब) फेकले. याशिवाय घराबाहेरुन नागरिक जाताना दिसल्यास त्यांच्यावर खिडकीतून आणि दरवाज्यावाटे तो काडतुसे फेकत होता. यामुळे परीसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
अशात ३१ डिसेंबरला दहशतवाद विरोधी पथक आणि बॉम्ब शोधक पथक यांनी संयुक्तपणे सापळा रचून अखेर त्याला अटक केली आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे सह.पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.