पालघर Palghar Accident : सोमवारी (१८ डिसेंबर) मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातीवली गावाजवळ मागून येणाऱ्या एका भरधाव कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दुचाकीस्वार आणि १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाले होते. या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वार लक्ष्मण भोये (२२) याचा मंगळवारी सायंकाळी तर १६ वर्षीय मुलीचा बुधवारी मृत्यू झाला. आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
दुचाकी २०-२५ फूट दूर जाऊन धडकली : सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास मुंबईच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणाऱ्या कार चालकानं दुचाकीला भीषण धडक दिली. कारच्या धडकेत दुचाकी २० ते २५ फूट दूर जाऊन सूचना फलकाला धडकली. या अपघातात दुचाकीवरील तिघंही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी महामार्गावरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सिल्वासा येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथं उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती आणि मुलगी नात्यानं काका-पुतणी आहेत. तर मुलीची आई अनुसया भोये (४०) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी : सातीवली गावातील दर्शन हॉटेल जवळ हा अपघात झाला. सहापदरी असलेला हा मुंबई-अहमदाबाद महामार्ग अपूर्ण कामामुळे सध्या चौपदरी सुरू आहे. मात्र अरुंद होणारा रस्ता, धोक्याच्या ठिकाणी असलेलं क्रॉसिंग तसेच धोक्याच्या सूचना देणारे फलक गायब असल्यानं या मार्गावर अपघाताला पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळं आता या परिसरातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सातीवली ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा जाधव यांनी केलीय.
हे वाचलंत का :