पालघर - भाताचे पीक तयार झाले आहे मात्र, पावसाच्या संकटमुळे तयार झालेल्या भात पिकाची कापणी करावी की नाही, असा प्रश्न पालघरमधील शेतकऱ्यांना पडला आहे. जोरदार पाऊस आल्यास पिकाची कापणी केली तरीही नुकसान होणार आणि नाही केली तरी नुकसान होणार आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील शेतकरीवर्ग मुख्यत्वे भातपिकाचे उत्पादन घेत असतो. यावर्षी कोरोनाचे संकट असूनही शेतकऱ्यांनी अनेक अडचणींवर मात करत भाताची लागवड केली. नाशिक, तलसारी, डहाणू, जव्हार, मोखाडा या ठिकाणांहून मजूर बोलवून भाताची लागवड करण्यात आली. लागवडीनंतर समाधानकारक पाऊस झाल्याने पीकही जोमात आले. मात्र, नेमका कापणीच्यावेळी पावसाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
तयार पिकाला पाणी लागले तर तांदुळ दाण्याच्या गुणवत्तेत फरक पडतो. तसेच कडबा देखील जनावरांना खाण्यालायक राहत नाही. त्यामुळे जर पाऊस पडला तर शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येणार आहे. सध्या जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाला सुरुवातही झाली आहे. त्यामुळेच शेतकरी हवालदिल झाला आहे.