पालघर- बोईसर-चिल्हार मार्गावर टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा पती गंभीररित्या जखमी झाला आहे. रेखा नरेश केणी (वय ६६, रा. विरार) असे मृत महिलेचे नाव आहे.
बोईसर-चिल्हार मार्गावर पाच बंगला परिसरात वाघोबा खिंड येथील वळणावर पाठीमागून आलेल्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या रेखा केणी या टँकरखाली चिरडल्या गेल्या. तर दुचाकीस्वार नरेस केणी हे गंभीर जखमी झाले.
दोघाही अपघातग्रस्तांना नागझरी येथील लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी रेखा यांना मृत घोषित केले. नरेश केणी यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, टँकर चालकाला बेटेगाव पोलीस चौकीवर अडवून पोलिसांनी चालकासह टँकर ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
हेही वाचा- ऑनर किलिंगचा प्रयत्न : वसईत आई-वडीलच उठले लेकीच्या जीवावर!