पालघर - 15 तासांपूर्वी जन्माला आलेल्या नवजात मुलीला कोरोनाची लागण झाल्याची बाब पालघरमध्ये समोर आली आहे. नवजात बाळाला कोरोना झाल्याची पालघर मधील ही पहिलीच घटना असून या बाळाला जव्हार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मातेची कोरोना अँटिजेन चाचणी निगेटिव्ह -
पालघर तालुक्यातील दारशेत येथील रहिवासी अश्विनी काटेला या मातेची पालघर शहरातील एका खाजगी रुग्णालयात मुदतपूर्व प्रसूती झाली होती. जन्माला आलेले नवजात बाळ वजनाने कमी असल्याने त्याला पालघरमधील दुसऱ्या एका रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे या बाळाची अँटिजेंन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. मातेची मुदतपूर्व प्रसूती झाल्याने तिच्यावर उपचार सुरू असून मातेची कोरोना अँटिजेन चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे.
कोरोनाची झाल्याचे समोर आल्यानंतर या बाळाला -
पालघर ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून जव्हार ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले आहे. बाळाची प्रकृती स्थिर असली तरी काही गुंतागुंत असलंयाने त्यावर जव्हार येथील रुग्णालयात उपचार देणे सोयीचे जाईल असे ग्रामीण रुग्णालयात असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.