पालघर - नालासोपारा विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. निवडणूक काळात नालासोपाऱ्यामध्ये शिवसेनेचे मूख्य नियंत्रण कक्ष व वॉररूम असणार आहे. पालघर जिल्हा संपर्क प्रमूख रवींद्र फाटक यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रदिप शर्मा म्हणाले, गेली 55 वर्ष मी मुंबईत राहतोय. त्यामुळे मी पाकिस्तानातून आलेलो नाही. मी तर इथलाच आहे.
पुढे ते म्हणाले, मूंबई पोलिसांची थोडी चूक झाली त्यांनी येथे लक्ष दिले नाही. जर लक्ष दिले असते तर दाऊदला पळवले तसे यांना पळवले असते, असे विधानही शर्मा यांनी केले आहे. यावेळी प्रदिप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा व निकिता व अंकीता या दोन्ही मूली सोबत होत्या. त्यांनी प्रदिप शर्मा यांच्या पी एस फॉऊंडेशनच्या कार्याबद्दल माहिती देत त्यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल समाधान व्यक्त केले. नालासोपारा विधानसभेसाठी अजून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी प्रदिप शर्मा हे निवडणूक प्रचारासाठी सक्रीय झालेले आहे. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ढोल ताशांच्या गजरात प्रदिप शर्मा यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे नालासोपारा विधानसभेचे संभाव्य उमेदवार प्रदिप शर्मा, जिल्हा प्रमूख वसंत चव्हाण, उपजिल्हा प्रमूख नविन दुबे, माजी जिल्हा प्रमूख शिरीष चव्हाण, तालुकाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर, संपर्क संघटक भारती गावकर आदि उपस्थित होते.