विरार(पालघर) - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वसई विरार तालुक्यातील महापालिका हद्दीतून जात आहे. 'ईटीव्ही भारत' रिअॅलिटी चेकच्या माध्यमातून बुलेट ट्रेन स्टेशनचे काम कितीपर्यंत सुरू आहे याबाबतची माहिती घेत आहोत. बीकेसी, ठाणे आणि आता विरार हे बुलेट ट्रेनचे तिसरे स्टेशन आहे. सध्या येथील जमिनी सरकारने ताब्यात घेऊन तिथे आता जेसीबीच्या मदतीने मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच स्टेशन होणाऱ्या ठिकाणी लोखंडी पोल देखील लावले आहेत. त्यामुळे सध्या याठिकाणी काम संथगतीनेच सुरू असल्याचे दिसून आले आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी स्पॉटवर जाऊन फॅक्ट चेक केली असता, काम सुरू असल्याचे दिसून आले आहे.
कुठपर्यंत आले काम? - बुलेट ट्रेनमध्ये जाणाऱ्या जमिनींची सध्या मोजणी सुरू आहे. जवळपास सर्वच जमिनी आता शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. तेथील जमिनीवर सिमेंट पोल लाऊन जमिनीवरती माती भराव सुरु आहे. जमिनीवरील घास जेसीबीने काढण्याचे काम सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरार येथील कामाला सुरुवात झाली आहे.
जमीन हस्तांतरित - वसई-विरार शहरांतून जाणाऱ्या बुलेट ट्रेनला विरोध करणारा महापालिकेचा ठराव अखेर शासनाने कायमस्वरूपी विखंडित केला होता. पालिकेचा ठराव विखंडित करून बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून राज्य शासन आणि वसई-विरार महापालिकेत निर्माण झालेल्या संघर्षात राज्य शासनाने बाजी मारली होती. त्यानुसार वसई-विरारमधून बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी महापालिकेने विकास आराखड्यात तरतूद करून नुकतीच रेखांकने निश्चित केली आहेत. त्यामुळे आता वसई-विरार शहरातून बुलेट ट्रेन जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील ७०.०९ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्यात ६०.४० हेक्टर खासगी क्षेत्र, ७.४५ हेक्टर वनक्षेत्र आणि २.२३ शासकीय जमिनीचा समावेश आहे.
७३ गावे बाधित - या बुलेट ट्रेनच्या मार्गामुळे पालघर जिल्ह्यातील ७३ गावे बाधित होणार आहेत. त्यात वसई तालुक्यातील विरार, कोपरी, चंदनसार, नालासोपारा येथील बिलालपाडा, मोरे, पोमण, मोरी, बापाणे, ससूनवघर, नागले, सारजा मोरी, नारिंगी, जुली बेट अशा एकूण २१ गावांचा समावेश आहे.
बुलेट ट्रेनची रेल्वे स्थानके : बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई यामध्ये एकूण 12 स्थानकं आहेत. त्यापैकी गुजरातमध्ये आठ स्थानके आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये चार स्थानके आहेत. गुजरातमध्ये वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद/नदियाड, अहमदाबाद व शेवटचे स्थानक साबरमती तर महाराष्ट्रात मुंबई(BKC Bullet Train Station ), ठाणे (Thane Bullet Train Station), विरार (Virar Bullet Train Station) आणि बोईसर (Boisar Bullet Train Station).