पालघर - जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी सोमवारी पालघर तालुक्यातील सफाळे भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानाचे पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे, तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी विभागाचे पथक उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतातील भातपिके शेतात डौलाने उभे राहिली. मात्र परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या शेतातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने बळीराजावर मोठे संकट कोसळले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर तालुक्यातील सफाळे विभागातील कन्द्रेभुरे, सरावली, माकणे, लालठाणे तांदुळवाडी, दहिसर, नावझे येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. कृषी व महसूल अधिकाऱ्यांना झालेले नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत करण्याचे निर्देश खासदार राजेंद्र गावित यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन खासदारांनी यावेळी दिले आहे.
हेही वाचा - इंस्टाग्रामचे फेक अकाउंट तयार करून मुलींना अश्लील संदेश पाठवणारा गजाआड
हेही वाचा - पालघरमध्ये सराईत गुन्हेगारांचा पोलिसांवर हल्ला; आरोपी फरार