पालघर- नालासोपारा येथे दहशतवादी हल्ला करण्यात येणार असून चौरसिया पान भंडार त्यांच्या रडारवर आहे, अशा मजकूराचा मॅसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला होता. या मॅसेजमुळे पोलिसांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे परिसरात काहीवेळ भीतीचे वातावरण पसरले होते.
नालासोपारातील प्रगतीनगर येथे राहत असलेले पाच तरुण हे दहशतवादी कृत्य करणार आहेत. अशा मजकुराचा मॅसेज पोलिसांच्या हाती लागला होता. त्यामुळे पोलिसांनी सतर्क होत तात्काळ शोध मोहिम सुरू केली.
पालघर दहशतवाद विरोधी पथक, ठाणे दहशतवाद विरोधी पथक, पालघर स्थानिक गुन्हे शाखा या सर्वांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हेदेखील तुळींज पोलीस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ठाण मांडून बसले. तुळींज पोलिसांनी मॅसेजमधील 1 फोटो आणि 5 जणांची नावे आलेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी आचोळे रोडवरील साईधाम टॉवरच्या परिसरातून तरुणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी तरुणांची कसून चौकशी केली. तपासाअंती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला मॅसेज खोटा असल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या पाचही तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. तसेच संबंधीत मोबाईल नंबर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील असून मानसिक त्रास देण्यासाठी किंवा कोणी तरी मस्करी केली असल्याचे समते.