वाडा (पालघर)- गुजरात राज्याच्या वेरावल, ओखा, पोरबंदर भागात रोजगारासाठी जिल्ह्यातून तलासरी, डहाणू या भागातून 10 हजाराहून अधिक संख्येने जाणाऱ्या खलाशी मजूर कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील व माजी आमदार पास्कल धनारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पालघर जिल्ह्यातील 10 हजाराहून अधिक खलाशी मजूर हे कोरोना प्रादुर्भावाच्या कालखंडात राज्याच्या सीमा बंदी असताना डहाणू, झाई या किनारी उतरविण्यात आले. यानंतर या मजुरांना तीन महिने काम नाही त्यामुळे ते पुन्हा गुजरातला जाण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी व्हायला हवी, तरच त्यांना गुजरात राज्यातील मालक वर्ग कामासाठी त्यांचा स्वीकार करू शकतील. त्यामुळे त्यांची आरोग्य तपासणी महत्वाची आहे, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी दिली आहे.
तत्कालीन कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीत हे खलाशी उतरत असताना त्यांना उंबरगाव येथे अडविण्यात आले होते. त्यानंतर हे खलाशी कामगार पुन्हा गुजरातच्या समुद्री भागात गेले होते. लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठकीत अखेर त्यांना पालघर जिल्ह्यात येण्याचा मार्ग सुकर झाला होता. खलाशी कामगार मजूर उतरत असताना त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काहींना होम क्वारंनटाईन करण्यात आले होते.
एकंदरित या मजूर खलाशी वर्गाला लॉकडाऊन काळात घरी परतण्यासाठी कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात आरोग्याच्या दृष्टीने खलाशी मजुरांची तपासणी करण्यात आली आणि आता ही अनलॉक काळात रोजगारकरिता या मजुरांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे बनले आहे.