पालघर/विरार - नालासोपारा येथून बेपत्ता झालेल्या ३० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह पाच दिवसांनी वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनारी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृत्यू समुद्रात बुडून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र कुटुंबियांनी यात घातपाताची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांकडे तक्रार देऊनही त्यांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे.
मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली अन्...
ममता पटेल असे या महिलेचे नाव असून ही मूळची गुजरात राज्यातील नवसारी येथे राहणारी होती. दोन महिन्यापूर्वी तिचा विवाह नालासोपारा पुर्वेच्या एव्हरशाईन नगर येथे राहणाऱ्या मेहुल पटेल या तरुणाशी झाला होता. बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजता ‘मॉर्निंग वॉक’ साठी म्हणून ती बाहेर पडली. त्यानंतर ती घरी परतली नव्हती. या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
मच्छिमाराने दिली माहिती
तिचा शोध सुरू असताना रविवारी संध्याकाळी तिचा मृतदेह वसई पश्चिमेच्या किल्ला बंदर समुद्र किनारी आढळून आला. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्यामूळे तिचा मृत्यूला दोन ते तीन दिवस उलटून गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. स्थानिक मच्छिमार व्हेलेंटाईन मिर्ची यांना पाण्यात मृतदेह आढळला. यानंतर त्यांनी वसई पोलीस ठाण्यात या घटनेची वर्दी दिली.
आम्ही सर्व शक्यता तपासून पाहत आहोत
सदर महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली ते अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘या प्रकरणी आम्ही सर्व शक्यता तपासून पाहत आहोत. ती येथे कुणासोबत आणि कशी आली याचा तपास करत आहोत’, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण कर्पे यांनी दिली. ‘जर काही संशयास्पद आढळले तर तपास तुळींज पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जाईल, असेही ते म्हणाले. प्रथमदर्शनी सदर मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याने वसई पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
ती समुद्र किनारी गेली कशी?
पोलिसांनी तपास लगेच केला नाही. ती समुद्र किनारी गेलीच कशी? चार दिवसांनी तिचा मोबाईल सुरू होऊन बंद कसा झाला? या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करायला हवा, अशी मागणी मृत ममताते नातेवाईक हेमंत बारोट यांनी केली आहे.
हेही वाचा - 50 वर्षीय व्यक्तीने वाचविले समुद्रात पडलेल्या महिलेचे प्राण, पाहा थरारक VIDEO
हेही वाचा - चिंचणी समुद्रकिनारी धिंगाणा घालणाऱ्या मद्यपी पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला; तिघांना अटक